Pages

आकाशी 'चांदणे' होते

ते हताश येथे झाले,बेकारीच्या नांदीने
खुणविले तयांना तेथे, चरीतार्थाच्या संधीने
परदेशी म्हणुनी गेले, ते सात समुद्रापार
आपुली ती मायभूमी अन आपुले सोडूनी घरदार
त्या अनोळखी भूमीवर ओळखीचे काही न्हवते,
परी नित्य ओळखीचे आकाशी 'चांदणे' होते.
सारेच निराळे होते,अन तऱ्हा तेथली आगळी
गतिमान जीवनापुढती, माणसे धावती सगळी
ते निटनेटके रस्ते, स्वच्छता पाहण्याजोगी
हिरवळहि भासे तिथली, ती चैन विलासी भोगी
हिरवाईत पण तुळशीचे एकले रोपही न्हवते
परी नित्य ओळखीचे ते आकाशी 'चांदणे' होते.
आपुलेपण दाखविणारा, न्हवता तेथे शेजार
आपुल्या मातीची याद, करी त्यांना नित बेजार
भासला किती समृद्ध, जरी नवा देश हा न्यारा
तरी आता आठवे आपुली, धरती अन तिथला वारा
'INSTANT' खावया सारे,परी पुर्णब्रम्ह ते न्हवते
परीनित्य ओळखीचे आकाशी 'चांदणे' होते &a mp;n bsp;
मनी येता आठव घरचा, नित दृश्य विसावे नजरी
ते आपुले प्रिय घरकुल ,अन माय तयातील हसरी
गारठ्यात आणण्या उब, कृत्रिम तिथे उपकरणे
ना तिथे उब मायेची, ना मायेचे पांघरणे
धनप्राप्तीच होती जमेला, ममतेचे कुणीच न्हवते
परी नित्य ओळखीचे आकाशी 'चांदणे' होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा