Pages

डिव्होर्स हवाय !!!

दारावरची बेल वाजते. एक तरुण पुरुष दार उघडतो... तरुण स्त्री अत्यंत वैतागून आत येते.
दार लावून घेते. तो परत जे काम करत असतो त्यात गर्क होतो. ती बसून राहते , थोडा वेळ शांतता.

...

ती : मला डिव्होर्स हवाय....

तो : काय झालं ?

ती : आताच्या आता.... ताबडतोब मला डिव्होर्स दे.

तो : पण का ?

ती : मग तरी निदान - डिव्होर्सच्या धक्क्यातून सावरायला मी कुठेतरी लांब जाऊ शकेन दुख , यातना विसरण्यासाठी ... कुठल्यातरी अभयारण्यात एकटी फिरेन. ना ही गर्दी असेल ना ट्रॅफिक जॅम. तुला माहितीये , चर्चगेट टू अंधेरी फास्ट ट्रेनने बरोबर ३५ मिनिटांत पोहोचले पण अंधेरी टू घर , दीड तास. इतका ट्रॅफिक जॅम होता की मी बसमधून उतरले नि चालू लागले. रस्ते पण इतके घाण झालेत आणि... आणि सतत कुठून तरी कोणी तरी थुंकत असतं. स्वत:ला बचावत कशीबशी पुढे आले , रिक्षा केली तर रिक्षावाल्यानेही फसवलं. सगळे फसवतात रे आपल्याला. आपण टीव्ही नाही घेतला , आपल्याकडे गिझर नाही तरी इलेक्ट्रिकचं बिल भरभसाट , मोबाइलवर पण कामापुरतं बोलूनही भयानक बिल. ते वाचलंस ना दुधात भेसळ , भाज्यांना केमिकल्स लावून हिरवं करणं - मला राग येतोय. त्यात आपली लिफ्ट बंद होती. मेण्टेनन्स कशासाठी भरायचा मग... मला डिव्होर्स दे किंवा दूर कुठेतरी घेऊन चल , कंटाळा आलाय - रोज तेच तेच...

तो : चल आताच्या आत निघू जी ट्रेन मिळेल त्यात बसू जिथे वाटेल तिथे उतरू कोणाहीकडे राहू दोन दिवस मुक्काम परत खांद्यावर शिदोरी घेऊन पुढे जाऊ रात्रभर तारे बघू , शेतात फिरू , उन्हात रापू , दिवसभर समुद्रकिनारी पहुडून राहू...चल.

ती : खरंच जाता आलं असतं तर किती बरं झालं असतं - असंच असावं ना आयुष्य.

तो : आर यू शुअर तिथे गेल्यावर गावात फिरताना कुठल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल
आपल्या कानावर येणारच नाही ? समुद्रातही किती प्रदूषण वाढलंय दिसणारच नाही
आपल्याला - म्हणजे आपण अगदी ठरवलं तर कदाचित नाही कळणार. आपल्याला सगळे
सेन्सेज बंद करायची सवय तर लागलीच आहे म्हणा...

ती : बघू तू परत मला निराश करतोयस. मला माहितीये सगळं वास्तव भयाण आहे.
पण एखादी वा-याची झुळूक कावळा , चिमणी , कबूतराव्यतिरिक्त एखादा पक्षी दिसणं ?
जाऊ देत काहीच शक्य नाही - आणि रोजची पैसा मिळवून देणारी कामं सोडून जायची
धमकही नाहीये रे - उद्या माझं प्रपोजल सँक्शन होईल का ? आज बॉस खुश झाला - बास्स एवढंच आयुष्य...
म्हणून मला एखाद्या मोठ्या धक्क्याची गरज आहे - दे ना रे डिव्होर्स मला किंवा एखादं अफेअर कर...

तो : चहा घेतेस ? नाही मस्त लिंबू सरबत करतो तुझ्यासाठी - फ्रेश वाटेल. मग बोलू अफेअरबद्दल...

( ती हसते - हळूच त्याला मिठी मारते)

ती : चल परत पळून जाऊ या...

तो : उद्या बघू...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा