Pages

शिव चरित्र पोवाडा

पुरोगामी छत्रपती (पोवाडा) – शाहीर आत्माराम पाटील

हिंदवी स्वराज्याचा जनक । लोकनायक ।


राष्ट्रपाईक । छत्रपति शिवाजी महाराज ॥


जगत् युग पुरुषाचा ताज । महामानवी आत्मतेज ॥


तो सत्त्वगुणांचा चंद्र । जनीं राजेंद्र ।


रणीं महारुद्र । त्रिगुणसंपन्न तीव्रबुद्धी ॥


राजकर्तव्य दक्ष नृपती । जगांतिल महान् मुत्सद्दी ॥


चाल


साम्राज्यशाहीचें प्रस्थ उभ्या अवनीत ।


आन् आदिलशाही मोगलाई देशांत ।


ह्या राहुकेतूंच्या जबरदस्त ग्रहणांत ।


हा भारताचा भास्कर । सह्याद्रीवर ।


खुले प्रखर । स्वराज्य नाथ ॥


चाल


जमिनदारी जहागिरदारीला दिली मूठमाती ।


समता निर्मून समर सिद्धिला केली सैन्य भरती ॥


चाल


पकडला मोहिते मामा । नात्याची धरली नाहीं तमा ॥


तो चंद्रराव सासरा । लावला त्याला कासरा ॥


सोडला नाहीं फितूर सगा सोयरा ॥ तो कठोर कर्तव्याचा होता मोहरा ॥


चाल


घरभेदे शासिले घेतले जन विश्वासांत ।


जनता युग निर्माता शिवबा पहिला विश्वांत ॥


चाल


ती सुभेदाराची सून । असहाय बंदिनी असून ॥


ते मुसमुसतें तारुण्य । तें रसरसतें लावण्य ॥


शिवनीति कराया हरण । मदनानें मारला बाण ॥


पण शिवराया नितिमान । मदनास आणले शरण ॥


चाल


देऊनी वसनें अरिसुंदरीला मानियली माता ।


शत्रुच्याहि अब्रूचा रक्षक शिवराया होता ॥


चाल


सैन्यांत होते रणवीर । ते सर्वं धर्माचे वीर ॥


तानाजी, बाजी झुंजार । नेताजी नि पासलकर ।


तसे होते आरमारावर । नेकीचे मराठे वीर ॥:


इब्राहिम खान बहादुर । दौलतखान रणशूर ॥


आग्र्र्‍याच्या संकटावर । सुटकेची मात करणार ।


शिवबाला साथ देणार । ते राम रहीम मैतर ।


हिरोजी नि मदारी मेहेतर ॥


चाल


स्वराज्य कामीं पणीं लाविले सर्व पंथ धर्म ।


महान राष्ट्रीयतेचा केला महाराष्ट्रधर्म ॥


चाल


तो प्रतापगडचा खटका । पन्हाळी सटका ।


आग्र्‍याहून सुटका । शक्ति बुद्धि न् युक्तिवान ॥


दाखवी शिवबाची शान । विवेकी प्रसंग अवधान ॥


चाल


तो दास होता संताचा...संताचा । हव्यास गुणी पंथाचा ॥ जी जी जी ॥


तो हरहर रणवंताचा....वीरांचा । तो ऋणी सदा शहीदांचा ॥जी जी जी ॥


गावया पवाडा त्याचा....अहो त्याचा । तो प्रेरक डफतंताचा ॥जी जी जी ॥


चाल


वीर रसानें खडा कराया अवघा सह्यकडा ।


तानाजीच्या वीर-गतीचा वदवी पोवाडा ॥


चाल


जयसिंग स्वारीचा बदला । सुरतेवर चढवी हल्ला ॥


नाडीलें नाहीं कोणाला । अन् सज्जन गुणवानाला ।


नाडीलें न महिलां बालां ॥


चाल


दानशूर स्वर्गीय शेठ तो परीख मोहनलाल ।


कीर्ति ऐकुनी सुखी राखला विधवेचा महाल ॥


चाल


कृष्णेची दौड तुफान । शत्रूचे उडवी भान ॥


ती बघतां खडग भवानी । शत्रूची दाणादाणी ॥


सिद्दीचा उतरे माज । शरणीले पोर्तुगीज ॥


इंग्रज राहिले चूप । पाहूनी शिव प्रताप ॥


दिल्लीला आला ताप । दुनियेची उडाली झोंप ॥


चाल


सह्याद्रीच्या कडेकपारीं लढला शिवराया ।


हिमालयाच्या स्वातंत्र्याचा घडला मूळ पाया ॥


चाल


श्रीछत्रपती शिवराय । हिंद सरताज ।


अवनीचा साज । आठवा शौर्य स्वरुप गुण ॥


आत्मारामाची तुम्हा आण । चालवा नवा हिन्दुस्थान ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा