Pages

हे भलते अवघड असते

गाडी सुटली, रूमाल हलले,
क्षणांत डोळे टचकन ओले
गाडी सुटली, पडले चेहरे,
क्षण साधाया हसरे झाले

गाडी सुटली हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटू दे म्हंटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते

गाडी गेली, फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली, डोळ्यांमधल्या निर्धाराचा पारा फुटला

हे भलते अवघड असते
कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना
डोळ्यांतील अडवून पाणी, हुंदका रोखुनी कंठी
तुम्ही केविलवाणे हसता अन्‌ तुम्हास नियती हसते
हे भलते अवघड असते

तरी असतो पकडायाचा हातात रूमाल गुलाबी
वार्‍यावर फडकवताना पायाची चालती गाडी
ती खिडकितून बघणारी अन्‌ स्वत:मधे रमलेली
गजरा माळावा इतुके ती सहज अलविदा म्हणते
हे भलते अवघड असते

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू
इतक्यात म्हणे ती "माझ्या कधी गावा येशील का तू?"
ती सहजच म्हणुनी जाते मग सहजच हळवी होते
गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते‌
हे भलते अवघड असते

कळते की गेली वेळ न आता सुटणे गाठ
आपुल्याच मनातील स्वप्‍ने घेऊन मिटावी मूठ
ही मूठ उघडण्यापूर्वी चल निघुया पाऊल म्हणते
पण पाऊल निघण्यापूर्वी गाडीच अचानक निघते
हे भलते अवघड असते

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी
ओठांवर शीळ दिवाणी बेफिकीर पण थरथरती
पण क्षणक्षण वाढत असते अंतर हे तुमच्या मधले
मित्रांशी हसतानाही हे दु:ख चरचरत असते
हे भलते अवघड असते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा