Pages

ह्य़ा रांडमुंड वस्त्या

ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड
शिवारामधल्या शिवीला आणि जात्यामधल्या ओवीला
गोठय़ामधल्या गाईला आणि थानं सुकलेल्या आईला
परकर पोलक्यामधल्या तायडीला नि पाळी चुकलेल्या बायडीला
खांदा नसलेल्या कावडीला नि गळा सुकलेल्या बावडीला
घे स्वप्नांचं पीक नि जागा मिळंल तिथं वीक
विकलं गेलं तरीबी ठीक, नाहीतर जा की मरणं शीक.
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड

उंबरा तुटलेली दारं, ही चौकटी फुटलेली घरं
वांझ झालाय पापणीचा पूर, विझून गेलाय चुलीमधला धूर
कोरडय़ाठाक आभाळाचं हे मातीमोल गाऱ्हाणं
कपाळपांढऱ्या गर्भामधलं हे हंबरणारं गाणं
जन्मनागव्या पाठीवरचा हा चरचरणारा वळ
दुखपांगळ्या पायांमधलं हे थरथरणारं बळ
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड
सेनेगल, सोमालिया, व्हेनेझुएला, मेक्सिको, हाइती
चंदीगड, सिमला, तिरुअनंतपुरम, नाशिक, नगरची भावकी
तांबवे खुर्द, म्हसवे बुद्रुक, मौजे कासारवाडा ठावकी
मका लांब पळत गेला, गायब झाली तूर
रान होतं उंबरवासाचं, त्याचा हरपून गेलाय सूर
कांदा-िलबू, मिरची-कोिथबीर, खुडता येत नाही आलं,
मातीमधलं पिवळं सोनं, काळंठिक्कार झालं.
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध

वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड - संजय कृष्णाजी पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा