संत तुकाराम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संत तुकाराम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें

वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ॥1॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ॥2॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवश्वरु॥3॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ॥4॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

तुका ह्मणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी ॥5॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

एवढे दे पांडुरंगा

माझिया गीतांत वेडे
दुःख संतांचे भिनावे
वाळल्या वेलीस माझ्या
अमृताचे फूल यावे !

आशयाच्या अंबरांनी
टंच माझा शब्द व्हावा;
कोरडा माझा उमाळा
रोज माधुर्यात न्हावा !

स्पंदने ज्ञानेश्वराची
माझिया वक्षात व्हावी;
इंद्रियांवाचून मीही
इंद्रिये भोगून घ्यावी !

एकनाथाने मलाही
बैसवावे पंगतीला
नामयाहाती बनावे
हे जिणे गोपाळकाला !

माझियासाठी जगाचे
रोज जाते घर्घरावे
मात्र मी सोशीन जे जे
ते जनाईचे असावे !

मी तुकयाच्या लोचनांनी
गांजल्यांसाठी रडावे;
चोख व्यवहारात माझ्या
मी मला वाटून द्यावे !

ह्याविना काही नको रे
एवढे दे पांडुरंगा !
ह्याचसाठी मांडिला हा
मी तुझ्या दारात दंगा !