sandip khare लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
sandip khare लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अजून तरी रूळ सोडून

अजून तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा
आणि अजून तरी नाही अमच्या चारित्र्यावर धब्बा

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पूर
आम्हांलाही दिसल्या शम्मा अन् शम्मेचे नूर
अजून तरी परवाना हा शम्मेपासून दूर
मैत्रिणीच्या लग्‍ना गेलो घालून काळा झब्बा

कुणी नजरेचा ताणून नेम केलेले जखमी
कुणी ओठांची नाजुक अस्त्रे वापरली हुकुमी
अन्‌ शब्दांचे जाम भरोनी पाजियले कोणी
मैखान्यातही स्मरले आम्हां मंदिर-मस्जिद-काबा

कधी गोडीने गाऊन गेलो जोडीने गाणी
रमलो ही जरी विसरून सारे आम्ही खुळ्यावाणी
सर्वस्वाची घेऊन दाने आले जरी कोणी
अजून तरी सुटला नाही हातावरला ताबा

कोण जाणे कोण मजला रोखून हे धरते
वाटा देती हाका तरी पाऊल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुनही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा

                                 - संदीप खरे