अताशा असे हे मला काय

अताशा असे हे मला काय होते?
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दांत येते

कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा

न अंदाज कुठले, न अवधान काही
कुठे जायचे, यायचे, भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे, न अनुमान काही

कशी ही अवस्था कुणाला कळावे?
कुणाला पुसावे? कुणी उत्तरावे?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे?

                    - संदीप खरे 

अजून तरी रूळ सोडून

अजून तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा
आणि अजून तरी नाही अमच्या चारित्र्यावर धब्बा

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पूर
आम्हांलाही दिसल्या शम्मा अन् शम्मेचे नूर
अजून तरी परवाना हा शम्मेपासून दूर
मैत्रिणीच्या लग्‍ना गेलो घालून काळा झब्बा

कुणी नजरेचा ताणून नेम केलेले जखमी
कुणी ओठांची नाजुक अस्त्रे वापरली हुकुमी
अन्‌ शब्दांचे जाम भरोनी पाजियले कोणी
मैखान्यातही स्मरले आम्हां मंदिर-मस्जिद-काबा

कधी गोडीने गाऊन गेलो जोडीने गाणी
रमलो ही जरी विसरून सारे आम्ही खुळ्यावाणी
सर्वस्वाची घेऊन दाने आले जरी कोणी
अजून तरी सुटला नाही हातावरला ताबा

कोण जाणे कोण मजला रोखून हे धरते
वाटा देती हाका तरी पाऊल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुनही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा

                                 - संदीप खरे 

मन तळ्यात मळ्यात

मन नाजुकशी मोतीमाळ
तुझ्या नाजुकश्या गळ्यात
मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात


उरी चाहुलींचे मृगजळ
वाजे पाचोळा उगी कश्यात
मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात

इथे वाऱ्याला सांगतो गाणी, माझे राणी
इथे वाऱ्याला सांगतो गाणी
आणि झुळूक तुझ्या मनात
मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात

भिडू लागे अङ्गलगि, होहो  हो  हो
भिडू लागे अङ्गलगि
तुझ्या नकळत कोर नभात
मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात

माझ्या नयनी नक्षत्र तारा
आणि चांद तुझ्या डोळ्यात
मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात

ती परत गेली

ती परत गेली जाताना
त्याच्याशी  काहीच नाही बोलली

बोलायचं होत ते त्याचा मनातच राहिल
तिला पाहून तो बोलायचं होत ते विसरल

तिच्याशी  बोलायची त्याची झाली नाही ताकत
पण तिने तरी दाखवायची होत थोडी हिम्मत

प्रत्येक वेळी त्यानेच का कधी तरी तिने हि बोलव
बोलायचं राहूदे किमान नजरेने तरी टोलाव

ती आणि तो मठ हे कसे
एकमेकाशी  बोलायला शिकवणार कोण कसे

कवी - सत्यजीत पवार