आज म्हटलं आयुष्य विणायला घेउया
जमतंय का ते बघुया
वाटलं अगदी सोपं असेल!
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल!
प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे
एक दोनच की सगळेच वापरायचे!!
मग ठरवलं फक्त छान छानच धागे घेऊ
एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणू !
सुरुवात केली वात्सल्याच्या धाग्याने
धागा होता फार उबदार आणि मुलायम
म्हटलं छान आहे हा धागा
धाग्याने ह्या विण राहील कायम!
मग घेतला मैत्रीचा धागा
म्हणता म्हणता ब-याच भरल्या जागा!
थोडं थोडं आयुष्य आकार घेऊ लागलेलं
पण अजूनही बरंचस विणायचं बाकी रहिलेलं!
एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला!
प्रत्येक धाग्यात तो आपसूकच गुंफत गेला!
हळू हळू विण घट्ट होत होती
तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती!
मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा
धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्याने त्या आयुष्याला
अर्थ आला लागुनी!
एक एक घेतला धागा
यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा
आयुष्याला त्यामुळे एक नवा
उद्देश्य मिळाला!
सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते!
तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्न होते!
थोड़े धागे पडले होते
निवांत बसून असेच!
म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे
आयुष्य होतंय का सुरेख!
मग घेतला एक धागा दुःखाचा एक निराशेचा
एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा!!
हे चारही धागे विणता एकमेकांमधे
आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे!
अपयशाशिवाय यश नाही
दुःखाशिवाय सुख नाही!
पराजयाशिवाय जय नाही
आणि निराशेशिवाय आशा नाही!
महत्व पटलं आहे सर्व धाग्यांच आज मला
सुंदर सुंदर धाग्यांनीच फक्त मजा नसते आयुष्याला!
साध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही
रंगसंगती ही लागतेच!
मग आयुष्य विणतानाच
आपल्याला भीती का वाटते?
सर्व धागे एकमेकांत विणूनच
एक परिपूर्ण आयुष्य बनतं!
कुठला धागा कुठे,
कसा वापरायचा
हे मात्र ज्याचं त्याच्यावर असतं !!