शब्द

रामायण घडले |महाभारत घडले |
त्यांना कारणीभूत |होते कुजके शब्द ||

म्हणून शब्द जपावा |शब्द पुजावा |
शब्द पुसावा |बॊलण्या आधी ||

घासावा शब्द |तासावा शब्द |
तोलावा शब्द |बोलण्या पूर्वी ||

शब्द हेचि कातर |शब्द सुईदोरा |
बेतावेत शब्द |शास्त्राधारे ||

बोलावे मोजके |नेमके ,खमंग ,खमके |
ठेवावे भान |देश ,काळ ,पात्राचे ||

बोलावे बरे |बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर |पाडू नये चरे ||

कोणाचेही वर्म |व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म |काढूच नये ||

थोडक्यात समजणे |थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे |हि संवाद कला ||

शब्दांमध्ये झळकावी |ज्ञान ,कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा |प्रत्येक शब्द ||

शब्दां मुळे दंगल |शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल |जागृत राहावे ||

जीभेवरी ताबा |सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी |नासू नका ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा