प्रेम

प्रेम  Prem(Love)


एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.

त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी
मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला
हवी, असा तिचा कटाक्ष असे.

त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची
राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती
तिच्या मनात नेहमीच असते.

दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्यासारखा
असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत
असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा
ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर
पडण्याचा मार्ग सांगतो.

तिचा पहिला मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात
त्याचा मोठा सहभाग असतो. तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर
खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.

एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप
कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो, ""माझ्याकडे
भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा मृत्यू
होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.

ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर सर्वाधिक
प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप
काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ
करशील ना?''

""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.

त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.

त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले.
आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही' म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू
गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.''

त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.

आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""मी नेहमीच तुझ्याकडे मदतीच्या
अपेक्षेने येते. तूही मला मदत करतोस. माझ्या सुख-दुःखात सहभागी होतोस. यावेळीही
तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''

""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''

त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.

.. तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी
येईन.''

ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी,
दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून
गेली आहे.''


वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.

आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले
पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते. आपला तिसरा मित्र म्हणजे, आपली
मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप
दुसऱ्याचे होते. दुसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या
कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.


आणि पहिला मित्र म्हणजे कोण? ........

... पहिला मित्र म्हणजे आपला 'अंतरात्मा' (परमेश्वेर) ज्याच्याकडे आपण जास्त
लक्ष देत नहीं अणि तोच आपला शेवटपर्यंत सोबती असतो.... :)

1 टिप्पणी: