अभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

माझें माहेर पंढरी

माझें माहेर पंढरी ।
आहे भीवरेच्या तीरीं ॥१॥

बाप आणि आई ।
माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥

पुंडलिक आहे बंधू ।
त्याची ख्याती काय सांगूं [१] ॥३॥

माझी बहीण चंद्रभागा ।
करीतसे पाप भंगा ॥४॥

एका जनार्दनीं शरण ।
करी माहेरची आठवण ॥५॥

नको वाजवू श्रीहरी मुरली

नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे

खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ
जल स्थिरावली

घागर घेऊन पाणियासी जाता
डोईवर घागर पाझरली
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
राधा गौळण घाबरली

काया ही पंढरी

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।
नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥

भाव-भक्ति भीमा उदक तें वाहे ।
बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥

दया-क्षमा-शांति हें चि वाळुवंट ।
मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥

ज्ञान-ध्यान-पूजा विवेक आनंद ।
हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥

दश इंद्रियांचा एक मेळ केला ।
ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥

देखिली पंढरी देहीं-जनीं-वनीं ।
एका जनार्दनी वारी करी ॥६॥

रूपें सुंदर सांवळा गे माये

रूपें सुंदर सांवळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधनें चारिताहे ॥१॥

रुणझुण रुणझुण वाजवी वेणु ।
वेधीं वेधलें आमुचें तनमनु वो माये ॥२॥

गोधनें चारी हातीं घेऊनि काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषें जगजेठी ॥३॥

एका जनार्दनीं भुलवी गौळणी ।
करिती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

माझें माहेर पंढरी

माझें माहेर पंढरी ।
आहे भीवरेच्या तीरीं ॥१॥

बाप आणि आई ।
माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥

पुंडलिक आहे बंधू ।
त्याची ख्याती काय सांगूं [१] ॥३॥

माझी बहीण चंद्रभागा ।
करीतसे पाप भंगा ॥४॥

एका जनार्दनीं शरण ।
करी माहेरची आठवण ॥५॥

कांदा-मुळा-भाजी

कांदा-मुळा-भाजी ।
अवघीं विठाबाई माझी ॥१॥

लसुण-मिरची-कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरीं ॥२॥

ऊस-गाजर-रातळू ।
अवघा झालासें गोपाळू ॥३॥

मोट-नाडा-विहींर-दोरी ।
अवघीं व्यापिली पंढरी ॥४॥

सावता ह्मणें केला मळा ।
विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥

आमुची माळियाची जात

आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥१॥

आम्हां हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलझाडां ॥२॥

शांति शेवंतीं फुलली । प्रेम जाई-जुई व्याली ॥३॥

सांवत्याने केला मळा । विठ्ठल देखियेला डोळां ॥४॥

दळितां कांडितां

दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥

न विसंबे क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ॥२॥

नित्य हाचि कारभार । मुखीं हरि निरंतर ॥३॥

मायबाप बंधुबहिणी । तूं बा सखा चक्रपाणी ॥४॥

लक्ष लागलें चरणासी । ह्मणे नामयाची दासी ॥५॥

जनी उकलिते वेणी

तुळशीचे बनीं ।
जनी उकलिते वेणी ॥१॥

हातीं घेऊनियां लोणी ।
डोई चोळी चक्रपाणि ॥२॥

माझे जनीला नाहीं कोणी ।
ह्मणुनी देव घाली पाणी ॥३॥

जनी सांगे सर्व लोकां ।
न्हांऊं घाली माझा पिता ॥४॥

येग येग विठाबाई

येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥

भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींच्या गंगा ॥२॥

इतुक्यासहित त्वां बा यावें । माझे रंगणीं नाचावें ॥३॥

माझा रंग तुझे गुणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥

धरिला पंढरीचा चोर

धरिला पंढरीचा चोर । प्रेमें बांधुनियां दोर ॥१॥

हृदयी बंदिवान केला । आंत विठ्ठल कोंडला ॥२॥

शब्दें केली जडाजडी । पायीं विठ्ठलाचे बेडी ॥३॥

सोहं शब्द नाद केला । विठ्ठल काकुळती आला ॥४॥

जनी ह्मणे बा विठ्ठला । जीवें सोडीं न मी तुजला ॥५॥

जनी ह्मणे पांडुरंगा

जनी ह्मणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जिवलगा ।
विनविते सांगा । महिमा साधुसंतांचा ॥१॥

कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरीं ।
पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥

कैसा आला हा गोविंद । कैसा झाला वेणुनाद ।
येउनी नारद । कां राहिला ॥३॥

कृपा करा नारायणा । सांगा अंतरींच्या खुणा ।
येऊं दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥४॥

घनु वाजे घुणघुणा

घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥१॥

चांदु वो चांदणे । चांपे वो चंदने ।
देवकीनंदनेविण । नावडे वो ॥२॥

चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥

सुमनाची सेज । सितळ वो निकी ।
पोळे आगीसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥

तुह्मी गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावी उत्तरें ।
कोकिळें वर्जावें । तुह्मीं बाईयांनो ॥५॥

दर्पणीं पाहतां । रूप न दिसे वो आपुलें ।
बाप रखुमादेवीवरें । मज ऐसें केलें ॥६॥

तुज सगुण ह्मणों कीं निर्गुण रे

तुज सगुण ह्मणों कीं निर्गुण रे ।
सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥

अनुमाने ना अनुमाने ना ।
श्रुति 'नेति नेति' ह्मणती गोविंदु रे ॥२॥

तुज स्थूळ ह्मणों कीं सूक्ष्म रे ।
स्थूळसूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥

तुज आकारु ह्मणों कीं निराकारू रे ।
आकारुनिराकारु एकु गोविंदु रे ॥४॥

तुज दृश्य ह्मणों कीं अदृश्य रे ।
दृश्यअदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥

तुज व्यक्त ह्मणों कीं अव्यक्तु रे ।
व्यक्तअव्यक्त एकु गोविंदु रे ॥६॥

निवृत्ती प्रसादें ज्ञानदेवो बोले ।
बाप रखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥७॥

देवाचिये द्वारीं

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधिलिया ॥१॥

हरि मुखें ह्मणा हरि मुखें ह्मणा ।
पुण्याची गणना कोण करीं ॥२॥

असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं ।
वेदशास्‍त्र उभारी बाह्या सदा ॥३॥

ज्ञानदेवो ह्मणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥

अरे अरे ज्ञाना

अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।
तुझें तुज ध्यान कळों आले ॥१॥

तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव ।
फिटला संदेह अन्यतत्त्वी ॥२॥

मुरडूनियां मन उपजलासी चित्तें ।
कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥

दीपकीं दीपक मावळल्या ज्योती ।
घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥

वृत्तीचि निवृत्ति अपणांसकट ।
अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥

निवृत्ति परमानुभव नेमा ।
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥

अवचिता परिमळू

अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।
मी ह्मणु गोपाळू, आला गे माये ॥१॥

चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥

तो सावळा सुंदरू कांसे पीतांबरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥

बोधुनी ठेलें मन तव जालें आन ।
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥

बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥

मोगरा फुलला

मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥

इवलेंसे रोप लावियलें द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥२॥

मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥३॥

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥

चरणकमळदळू रे भ्रमरा ।
भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥

सुमनसुगंधु रे भ्रमरा ।
परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥

सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा ।
बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥

आजि सोनियाचा दिनु

आजि सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥

हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥

दृढ विटे मन मुळी ।
विराजित वनमाळी ॥३॥

बरवा संतसमागमु ।
प्रगटला आत्मारामु ॥४॥

कृपासिंधु करुणाकरु ।
बाप रखमादेविवरू ॥५॥